तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्यावरील वाहनचालकाकरीता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुसज्ज अशा संडास बाथरूमची सोय करण्यात आली असुन त्याच्या सुरक्षा टाक्या भरल्या असल्याने या घाणीच्या दुर्गंधीने नागरीकासह बाजुचे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी येथे टोलनाका उभारण्यात आला असुन या टोलनाक्यावर सोलापूर व तुळजापुर कडील दोन्ही बाजूला रस्त्यावरील वाहनचालकाकरीता सुसज्ज असे संडास बाथरूम बांधले आहेत.तसेच संबधित अधिकारी व इतरांसाठीही वेगळ्या बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे.या बाथरूमच्या सुरक्षा टाक्या या पुर्णपणे भरल्या असुन त्यातील घाणीमुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे.तसेच ते घाण पाणी बाजुच्या शेतामध्ये जात असल्याने व त्याचा घाण वास येत असल्याने तसेच तिथे काम करत असताना अंगाला खाज सुटत असल्याने संबधित शेतकर्यांच्या शेतामध्ये खुरपणीची कामे करण्यासाठी महीला मजुर येत नाहीत त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.तसेच सुरक्षा टाक्यांच्या बाजुला गवत वाढले असुन त्यामध्ये सापांचा वावर वाढला आहे या सर्व गोष्टीबाबत टोलव्यवस्थापक व संबधित अधिकारी यांना वारंवार सांगुनसुध्दा कोणीही याकडे लक्ष देत नसल्याचे तेथील शेतकरी अमोल माळी यानी "तुळजापुर लाईव्ह" शी बोलताना सांगितले.
गेल्या तीन वर्षामध्ये या बाथरूमच्या टाक्या एकदाही साफ केल्या नसल्याने त्या भरून त्याचे घाण पाणी शेतामध्ये मुरत आहे. तसेच रात्री त्या सुरक्षा टाक्यांचे टोपण उघडे ठेवत असल्यामुळे संपुर्ण परीसरात दुर्गंधी पसरत आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला असुन त्यातच या दुर्गंधीने शेतकर्याचे मोठे नुकसान होत आहे.संबंधित वरीष्ठ अधिकारी यानी सुचना देऊन सदरील बाथरूमच्या भरलेल्या सुरक्षा टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात व परीसरात पसरणार्या दुर्गंधीला आळा घालावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.