बीड, दि. 22 : "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या मोहिमेंतर्गत जिल्हयातील चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 124 संशयित रुग्णांची कोरोना अॅटीजन तपासणी केली. यात 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये पाठवून रोगप्रसाराला काही अंशी तरी आळा बसवण्याचे काम केले असून 1246 कोमॉर्बिड रुग्णाची तपासणी केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश मंचुके यांनी सांगितले.
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, सरपंच मधुकर तोडकर, विलास शिंदे यांच्या सहकार्याने व डॉ. अंकुश मंचुके, डॉ. कैलास खाकरे यांच्या नियोजनाने यापूर्वी दि. 14 व 15 सप्टेंबर रोजी चौसाळा येथील व्यापाऱ्यांसह परिसरातील इतर संशयित असे 740 अँटीजन टेस्ट करण्यात आल्या पैकी 31 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यांना तात्काळ Covid Centre मध्ये पाठवून त्यांच्या सहवासीतांची तपासणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा याठिकाणी येथील टेक्निशियन संतोष खाकरे अविरतपणे अँटीजन तपासणी करत असून त्यांना सर्व आरोग्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास 108 रुग्णवाहिके द्वारे कोवीड सेंटर कडे नेण्याचे काम ड्रायव्हर मुळे व नाईकवाडे अविरतपणे सेवा देत आहेत.
