यवतमाळ, दि. 14 : राज्यातील ऊसतोड कामगारांना त्रिपक्षीय करारानुसार भाववाढ करुन प्रति टन 500 रुपये दर देण्यात यावा, तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार बोर्डावर राष्ट्रीय बंजारा मिशनचा प्रतिनिधी नियुक्त करावा, या मागणीचे लेखी निवेदन आज सोमवारी पुसद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे सहकार मंत्री व साखर आयुक्त पुणे यांना देण्यात आले आहे.
सध्या ऊसतोड कामगारांना प्रतिटन 240/- मजुरी मिळत आहे. मात्र हा दर खुपच कमी असून 2020-21 च्या गाळप हंगामाला सुरुवात होण्याआधी त्यात वाढ करून किमान 500/- रुपये प्रतिटन दर देण्यात यावा, तसेच कोरानामुळे कामगार दगावल्यास त्यांच्या वारसाला रुपये 10 लाखाचे विमा कवच जाहीर करावा, अशा मागणी निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राष्ट्रीय बंजारा मिशनचे पदाधिकारी यांनी पुसद उपविभागीय अधिकारी यांना आज दिले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विकास राठोड चोंढीकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष राम राठोड, तालुका अध्यक्ष निरंजन जाधव, तालुका सचिव सुरेश चव्हाण, पवनकुमार राठोड, सामाजिक कार्यकर्ता, पुसद तालुका युवाध्यक्ष आशिष चव्हाण, महासचिव रामप्रसाद राठोड, संघटक राम आडे, संघटक सुनील आडे, शंकर राठोड तालुका सचिव, संजय राठोड, दिलीप जाधव ऊसतोड ठेकेदार आदींची उपस्थिती होती
