जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील विद्यार्थी सेवा प्रकाशनचे संचालक, भाजपा नेते  भीमाशंकर हासुरे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. 

भीमाशंकर हासुरे हे महाराष्ट्रातील झटपट इंग्रजी व्याकरण या पुस्तकाचे ख्यातनाम लेखक आहेत. विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून घडलेले व्यक्तिमत्व आहे. ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्षाचे काम सुरू करून तुळजापूर तालुका अध्यक्ष पदावर असताना अनेक आंदोलने त्यांनी केली आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आदि निवडणुकात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उद्योग ते राजकारण असा प्रवास करणारे व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांचा साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्याशी जवळचे संबंध आहेत. त्यांच्या कार्याच्या जोरावर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या पदावर त्यांची पुनश्च फेरनिवड झाल्याने तुळजापूर तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्यांदा भीमाशंकर हासुरे यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच जळकोट येथील विद्याधन या त्यांच्या निवासस्थानी भीमाशंकर हासुरे यांचा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अर्जुन कदम, जळकोटचे माजी उपसरपंच बसवराज माळगे व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे व  कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


 
Top