नळदुर्ग, दि. 21 : गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने श्री क्षेत्र तुळजापुर व नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणा-या कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पात आज सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत 63 टक्के पाणीसाठा झाला आहे. बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने आजही पाण्याचा ओघ सुरुच आहे. त्यामुळे लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे.
गेल्य आठवडा भरापासून नळदुर्ग व परिसरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 35 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 63 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाच्या पावसाळ्यात नळदुर्ग शहरात जुन महिन्यात 96 मि.मी, जुलै 185 मिमी, ऑगस्ट 122, सप्टेंबर (21 सप्टेंबरपर्यंत) 219 मि.मी. एवढया पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरीच्या अंदाजे 600 मिमी पाऊस झाले आहे.
नळदुर्ग व परिसरात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. खरीपातील नगदी पिक समजले जाणारे उडीद हातचे गेल्याची चर्चा शेतक-यात आहे. तर सोयाबीनला कोंब फुटले आहे. अगोदरच संसर्गजन्य कोरोनाच्या महामारीत सर्वजण हवालदिल झाले असताना शेतक-याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
