नळदुर्ग, दि. 11 : ना मास्क, ना सामाजिक अंतर आणि शासनाच्या नियमाची एैशी की तैशी करणा-या नळदुर्ग येथे नागरीक व व्यापा-यांविरुध्द कारवाई करुन दंड आकारण्यात आला. सदरील कारवाई तुळजापूर तहसिलदार सौदागर तांदळे यांनी गुरुवारी (दि. 10) केली. या घटनेने शहरामध्ये व्यापारी व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. 

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या संसर्गजन्य कोरोनाच्या‍ पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिक व व्यावसायिकांसाठी नियम बनवलेले आहेत. मात्र नळदुर्ग शहरातील अनेक दुकाने सायंकाळी पाच वाजल्यानंतरही सुरू असतात. तर असंख्य सामान्य नागरिकही विनामास्क फिरतात. गुरूवारी तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत, नळदुर्ग नगपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, मंडळ अधिकारी अमर गांधले   यांनी नगरपालिकेचे पथक व पोलीस पथकासह सायंकाळी साडे पाच वाजता बसस्थानक परीसरातून कारवाईस सुरवात केली. यावेळी विनामास्क फिरणारे नागरिक, ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणारे व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे बसस्थानक परिसरात पालिकेच्या पथकाला न जुमानणा-या व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली. 

दरम्यान, दंडात्मक कारवाई केलेल्या काहींनी रक्कम दिली नसल्याचे समजते. अशा व्यापारी व नागरिकांवर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे लक्ष वेधले आहे.


 
Top