नळदुर्ग, दि. 05 : गरजू नागरिकांना आधार कार्ड काढणे व आधार कार्ड अद्ययावत करणे, यासाठी शोध घेवून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहे. तरीही लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे तीन-तीन दिवस नंबर लागत नाही. त्याकरीता बंद असलेले आधार कार्ड केंद्र चालू करावे व शहरामध्ये आणखीन नव्याने आधार केंद्र चालू करण्यास शासनाने परवानगी देण्याची मागणी नळदुर्ग शहरवासियांतून होत आहे. 

नळदुर्ग शहराअंतर्गत असलेल्या जवळपास 72 गावांचा दैनंदिन कामकाजासाठी संपर्क येतो. मात्र याठिकाणी असलेले आधार केंद्र बंद आहे. तर येथील टपाल कार्यालयात आधार कार्ड काढण्याची व आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा दोन वर्षापूर्वी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र येथील टपाल कार्यालयात याबाबत विचारणा केली असता  आधार कार्ड काढण्याची सुविधा अद्यापही येथे उपलब्ध झाली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच यासाठीच्या शुल्क आकारणीबाबतही कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे आढळले. विशेष म्हणजे काही महिनाभरापुर्वी संगणक व इतर साहित्य उपलब्ध झाले. दर शनिवारी आधार कार्ड काढण्याची सेवा दिली जाणार असल्याचे वर्षभरापूर्वीच टपाल कार्यालयातून सांगण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत ते कार्यान्वित झाले नाही. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील नऊ टपाल कार्यालयात विनाशुल्क आधार कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी फक्त पंचवीस रुपये नाममात्र शुल्क व  जीएसटी असे शुल्क आकारण्यात येणार आहे. नळदुर्गसह ग्रामीण भागातील सुमारे 72 गाव, वाडी वस्ती व तांड्यातील हजारो नागरिकांसाठी मोफत आधार नोंदणी सेवा ही दिलासादायक बाब असली तरी दोन वर्षानंतरही आधार कार्ड केंद्र कार्यान्वित न झाल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांची कुंचबना होत आहे. तरी वरिष्ठ पातळीवरुन याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून आधार केंद्र चालू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

 
Top