नळदुर्ग, दि. 05 : दुग्धजन्य उत्पादनात अग्रेसर ठरलेल्या बाभळगाव ता. तुळजापूर येथील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्टस प्रा.लि., कंपनीच्या संचालकांनी शासनाचे देणे थकविल्याने व गैरप्रकार केल्याने दहा महिन्यापूर्वी कंपनीच्या संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर शासनाने या कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करुन रक्कम वसुलीसाठी सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी जाहीर लिलाव करण्याची नोटीस तुळजापूर तहसिलदारानी काढली आहे. 

महामार्गावरील बाभळगाव ता. तुळजापूर शिवारातील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्टस प्रा.लि., या कंपनीचे समीर गोविंदलाल काकाणी, विजय विश्वनाथ मुळे, श्रीकांत हरिभाऊ जोशी यांच्याकडून महाराष्ट्र जमीन‍ अधिनियम 1966 नुसार येणे असलेल्या 34 कोटी 58 लाख 26 हजार 721 रुपये देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी पुर्वोक्त रक्कम देण्यात आली नाही तर मालमत्ता वैष्णोदेवी कंपनी बाभळगाव येथे सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाद्वारे विकण्यात येणार असल्याची नोटीस काढण्यात आली आहे. 

सदर लिलाव प्रक्रियेमध्ये जाहीर बोली पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. लिलावात जाहीर बोलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उच्चतम बोली धारकास अंतिम बोलीधारक समजण्यात येईल. तसेच काळ्या यादीमध्ये नाव असणा-या व्यक्तीस लिलावात भाग घेता येणार नाही. लिलावात भाग घेऊ इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक असून मागील वर्षी दाखल केलेल्या रिटर्नची प्रत दाखल करणे आवश्यक आहे. लिलाव स्विकारण्याचे अथवा नाकारण्याचे तसेच लिलावाचे जाहिर प्रगटनामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार तुळजापूर तहसिलदार यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. लिलावात भाग घेणा-या व्यक्तीला अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपये भरावे लागतील. लिलावात भाग घेणारा लिलावधारक हा शेतकरी असला पाहिजे. तसा पुरावा म्हणून 7/12 व 8अ सादर करावा लागेल, यासह विविध अन्य अर्टी व शर्ती आहेत. 


 
Top