मोहोळ, दि. 20 : तालुक्यातील नरखेड येथील प्रेमी युगल आत्महत्या प्रकरण ताजे असताना सोहाळे ता. मोहोळ गावात आणखी एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. या घटनेची नोंद कामती पोलिसात करण्यात आली आहे.

पूजा संजय बचुटे (माहेरचे नाव) वय- २१ वर्षे (रा. जायवाल ता. कवठे महांकाळ) आणि ज्ञानेश्‍वर रामचंद्र बचुटे (वय २५ वर्षे, दोघे रा. सोहाळे ता. मोहोळ) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की पूजा  हिचे लग्न दि. ३० ऑगस्ट २०२० रोजी मौजे जायवाल ता. कवठेमहांकाळ येथील प्रवीण भारत पाटील यांच्याशी झाले होते. दि. १३ सप्टेंबर रोजी ती येती-जाती साठी माहेरी सोहाळे तालुका मोहोळ येथे आली होती. तिचे भावकीतीलच स्पीकर मंडपचा व्यवसाय असणाऱ्या ज्ञानेश्वर रामचंद्र बचुटे याच्याशी गेल्या अनेक महिन्यापासून प्रेम संबंध होते. त्यामुळे तिला झालेले हे लग्न मान्य नव्हते. ज्ञानेश्वर आणि पूजा या दोघांनी एकत्र राहून सुखी संसार करण्याची स्वप्नं पहिली होती. मात्र दोघांचे नाते चुलत भाऊ-बहिणीचे असल्यामुळे त्यांच्या प्रेमाला समाज मान्यता मिळणे खूपच कठीण होते. 

दरम्यान दि. १९ सप्टेंबर रोजी दोन्ही प्रेमीयुगुलाची भेट झाली. भेटी दरम्यान त्यांनी "आपण एकत्र जगू शकत नसलो तर, आपण एकत्र मरु तर शकतो" असा निश्चय केला होता. त्यामुळे त्यांनी शनिवारी मध्यरात्री भावकीतील माणिक महादेव बचुटे यांच्या शेतातील पत्राशेड गाठले. त्या ठिकाणी त्या दोघांनी पत्रा शेडच्या अँगलला नायलॉनच्या एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रविवार २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रीतसर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कामतीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. 

या घटनेची खबर मुलीचे वडील संजय प्रभू बचुटे यांनी दिली असून कामती पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास कामतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे हे करीत आहेत. 

 
Top