तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी तुळजापुर भाजपाच्यावतीने मंगळवारी तुळजापुर तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन दि. 22 रोजी भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी दिले असून त्यात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुग व इतर पिकांचे कोरोना महामारीच्या काळात उसनवारीने पैसे घेऊन पेरणी केली. मेहनत मशागत, औषध फवारणी करून पिके घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हाता तोंडाशी आलेला घास अधिक पावसामुळे वाया गेला. त्यामुळे शेतातील पिकात पाणी असल्यामुळे पिक काढणे अशक्य आहे. यामुळे सोयाबीन, उडीद, मुग पुन्हा कोंब फुटून वाया गेला आहे. याकरिता शेतकऱ्यांना सरसकट पिकवीमा मिळाला पाहिजे, तसेच राज्य, केंद्र आपत्ती प्रतिसाद निधी मिळावी, मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात जे अनुदान मिळाले तसेच अनुदान उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याला मिळावे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या मार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नागेश नाईक, शिवाजी बोधले, सचिन रसाळ, विशाल रोचकरी, गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, सुहास सांळुके, रत्नदीप भोसले, दिनेश बागल, राम चोपदार, प्रसाद पानपुडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
