तुळजापूर, दि. 22 :  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदानिर्यात बंदीच्या निर्णयामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. निर्यातबंदीमुळे कांद्याच्या भावात घसरण होऊन शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने तुळजापुर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

शेतकरी अनेक संकटे येऊन शेती करतो, दर दोन वर्षांनी असणारा अवकाळी पाऊस, लॉकडाऊन नंतर करोना च्या पार्श्वभूमीवर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. यात भर म्हणून सरकारने कांदा निर्यातबंदी जाहीर केली या निर्णयामुळे कांद्याचे भाव सहाजिकच ढासळणार आणि शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात येणार, शेतकरी पिकवतो म्हणून लॉकडाऊन मध्ये देखील आपली कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था तग धरुन आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष अविनाश कोळगे, रोहित दरेकर, गणेश देवकते, प्रणय शिंदे, अनिकेत भोसले हे पदाधिकारी ‌ उपस्थित  होते.


 
Top