नळदुर्ग, दि. 23 : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी ता. तुळजापूर व तलमोड ता. उमरगा येथील चालू असलेले टोलनाके त्वरीत बंद करण्याची मागणी वाहन चालकांसह नागरिकांतुन केली जात आहे.
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरुच असून काम पूर्ण करण्याची निवेदेतील मुदतही संपून अनेक वर्षे झाली. मात्र अद्यापही या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. झालेले काम निकृष्ट व दर्जाहिन आहे. नळदुर्ग येथे बायपासचे काम अर्धवट असून नळदुर्ग-तुळजापूर जाणा-या राज्यमार्गावर अर्धवट बायपासच्या कामामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
तसेच महामार्गावर अपघात होऊन शेकडो नागरिक, प्रवासी, वाहनधारक व वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागल्याचे सर्वश्रूत आहे. तसेच एकाही गावात सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तरीही टोलनाके सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करुन सदरील टोलनाके बंद करण्याची मागणी होत आहे.
