नळदुर्ग,‍ दि. 16 : सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी ता. तुळजापुर येथील एसटीपीएल टोल नाक्यावर मनमानी कारभार सुरु असून वाहनचालकांतुन संताप व्यक्त केला जात आहे. 

गेल्या काही महिन्यापासून फुलवाडी येथील टोलनाका सुरु झाले आहे. मोठ मोठे फलक लावून वाहन टोल आकारणीचे दरपत्रक लावले आहे. त्यानुसार रिटर्न टोल पास दिला जात नसल्याने वाहन धारकांना टोल करापोटी दुप्पट रक्कम द्यावी लागत आहे. टोल नाक्यावरील या जाचक अटीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देऊन टोलनाक्यावरील ही जाचक अट बंद करून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 

वास्तविक पाहता नळदुर्ग पासुन पुढे राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षांपासुन अर्धवट अवस्थेत रखडत पडले आहे असे असतांना नळदुर्ग पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर फुलवाडी येथे टोलनाका सुरू करण्यात आला आहे. महामार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतरच टोल नाका सुरू करणे आवश्यक होते. मात्र याठिकाणी ठेकेदाराकडून महामार्गाचे काम पुर्ण करून घेण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग विभागाने टोल नाका सुरू करण्याला परवानगी दिली आहे. फुलवाडी येथील एसटीपीएल या टोलनाक्यावर एका चारचाकी लहान वाहनास ५० रुपये टोल आकारला जात आहे. मात्र या टोलनाक्यावर तेथील कर्मचारी वाहनचालकाना रिटर्न पास देत नाहीत त्यामुळे या मार्गावरून ये--जा करणाऱ्या एका वाहनास १०० रुपये खर्च होत आहे. वास्तविक पाहता इतर टोलनाक्याप्रमाणे याही टोलनाक्यावर रिटर्न पास मिळणे गरजेचे आहे.

 त्याचबरोबर टोलनाका परीसरातील जवळपास १० ते १५ किलोमीटर च्या आतमधील वाहनांना टोल आकारला जाऊ नये असा नियम असताना या टोलनाक्यावर या नियमचेही उल्लंघन होत आहे. आज नळदुर्ग शहरातील वाहनधारकानाही या टोलनाक्यावर टोल आकारला जात आहे. हे नियमानुसार आहे का याचा खुलासा राष्ट्रीय महामार्ग विभागाने करणे गरजेचे आहे. या टोलनाक्यापासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदुर्ग शहरातील वाहनधारकांना या टोलनाक्यावर टोल माफी मिळणे गरजेचे आहे. या टोलनाक्यावर रिटर्न पास का दिला जात नाही, तसेच या टोलनाक्यावर अन्य नियमांचे पालन केले जावे याबाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष घालणे गरजेचे आहे.





 
Top