तुळजापूर, दि. 16 : तुळजापुर तालुक्यातील सर्व नागरिकांनी "माझी गृहलक्ष्मी माझी जबाबदारी" या भावनेतून "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या मोहिमेत सहभागी होऊन कोरोना प्रतिबंधक विषयक जनजागृती व सदर मोहिमेत आढळून आलेल्या संशयित रुग्णांना तात्काळ कोरोना चाचण्यासाठी सर्वोत्तोपरी व्यवस्था करुन वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तुळजापूर येथे केले.
तुळजापूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर यांनी मंगळवारी तुळजापूर येथील तहसिल कार्यालयात सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी तुळजापूर येथील वाढत्या कोरोना रुग्णसंख्ये विषयी चिंता व्यक्त करुन सर्वांनी यात प्रामुख्याने तुळजापूर शहरातील नागरिकांनी सजग राहण्याची आवाहन केले आहे.
सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी तुळजापूर तालुक्यात "माझी गृहलक्ष्मी माझी जबाबदारी" या भावनेतून "माझे कुटूंब माझी जबाबदारी" मोहीम राबविण्याचे सुचित केले. सदर दोन्ही मोहिमेत आरोग्य विभाग, नगरपालिका विभाग, महसुल प्रशासन व पंचायत समिती विभाग, स्वयंसेवक यांनी एकत्रित मिळून तालुक्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत व व्यक्तीपर्यंत पोहचून प्रत्येक नागरिकांचे तापमान मोजणी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी, तसेच सर्दी, खोकला व ताप असलेले रुग्ण शोधणे, इतर दुर्धर आजारग्रस्त रुग्णांची तपासणी करुन यामध्ये जे रुग्ण संशयित असतील अशा रुग्णांना तात्काळ विलगीकरण करुन सदर रुग्णांची कोविड-19 ची तपासणी व उपचार तात्काळ करुन घेण्याबाबत जिल्हाधिका-यांनी यावेळी सुचित केले.
तुळजापुर शहरात श्री तुळजाभवानी मंदिरातील काही पुजा-यांना मागील काळात कोरोनाची लागण झालेली असून सर्व पुजारी बांधवांनी स्वत: पुढे येवून कोरोनाची चाचणी करुन घेण्याचे आवाहन करुन पुढे म्हणाले की, यापुढे तुळजापूर शहरामध्ये प्रवेश करताना चेकपोस्ट करावेत व त्याच ठिकाणी येणा-या भाविक व नागरिकांची तापमान मोजणी, शहरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले. तसेच तालुक्यात सध्या सीआरपीसी 144 कलम लागू असून पोलीसांनी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येवू देवू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी शासनांच्या सुचनांचे पालन होत नसेल तर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
बैठक सुरु असेपर्यंत तुळजापूर तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या 1 हजार 156 एवढी झालेली असून सद्यस्थितीमध्ये 229 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
या बैठकीस उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तुळजापूर तालुक्याचे कोरोना नोडल अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तुळजापुरचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नळदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, तामलवाडीचे सपोनि काळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंचला बोडके, नळदुर्ग न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगरपरिषद तुळजापूर यांचे प्रतिनिधी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उपस्थित होते.

