तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर र पुन्हा एकदा शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन दि. 23 सप्टेंबर  ते दि. 30 सप्टेंबर या कालावधीत असेल, असा निर्णय रविवार रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

तुळजापुर येथील नगर परिषद कार्यालयात दि. २० रोजी महसुल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व न.प. प्रशासनाची  बैठक  संपन्न झाली. यामध्ये  जनतेनी स्वःता पुढाकार घेऊन संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगावरती मात करुन साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा, तसेच  शहरात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसें दिवस वाढत असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व ही साखळी तोडण्यासाठी दि. 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू (कडक लॉकडाऊन) करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे,  नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. चंचला बोडके, विनोद गंगणे, बापुसाहेब कणे, औंदुबर कदम, किशोर साठे, नगरसेवक अमर मगर, सुनील रोचकरी, विशाल रोचकरी आदीसह नगससेवक  उपस्थित होते.

सदरील जनता कर्फ्यु मध्ये प्रामुख्याने दवाखाने, रुग्णालय शेजारचे मेडिकल दुकाने २४ तास चालु राहतील. इतर मेडीकल ९ ते १ पर्यत चालु राहतील. तसेच दुधासाठी सकाळी ७ ते ९ कालावधी राहणार आहे. शहरातील सर्व दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट, पेट्रोल पंप यासह सर्व आस्थापने बंद राहतील, तसेच बँका सहभागी करुन घेण्यात येईल. तसेच सध्या शेतकऱ्यांची  शेतातील कामे चालु आहेत त्यामुळे शेतीविषीयक कामे चालु राहतील.  त्याचप्रमाणे दुचाकी व चार चाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणाऱ्यास दोन हजार रुपये  व  विना मास्क लावता फिरण्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

सदरील कालावधीमध्ये सर्व जनतेने जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, घरी राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन, महसुल, आरोग्य विभाग व  न.प. प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



 
Top