उस्मानाबाद, दि. 11 : कोरोनाचा फैलाव राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असून आता आमदार देखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार कैलास पाटील यांनी स्वत: फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली असून त्यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये संपर्कातआलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.
आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजच काही वेळापुर्वी माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनाच्या अगोदरही मी टेस्ट केली होती, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मी अधिवेशनात सहभागी झालो होतो. पण काल पुन्हा टेस्ट केली होती. अहवाल आताच प्राप्त झाला असुन त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापुर्वी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे मी आवाहन करतो. माझी प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.