उस्मानाबाद, दि. 14 : तालुक्यातील तेर येथे दिवसेंदिवस कोरोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सतर्कतेसाठी सात दिवसांपुर्वी गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य यंत्रणा व संबंधित प्रशासनास उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निर्देश दिले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी आज सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी आमदार पाटील यांनी तेर गावास भेट दिली. यावेळी आ. पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

तेर ता. उस्मानाबाद येथे आतापर्यंत एकुण १४५ कोरोना संशयीत रुग्ण आढळलेले असुन त्यापैकी ९८ रुग्ण हे कोरोना बाधीत असून ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे.  या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत येथील ६ वार्डांमध्ये प्रत्येकी ७ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले असून ज्यामध्ये वार्डातील ३ ग्रामपंचायत सदस्य, २ आशा सेविका व २ समाजसेवक असतील. अशा प्रकारे एक टिम तयार करुन सदरील समितीने वार्डामधील प्रत्येक घरात जाऊन कुटुंबियांची सर्व माहिती संकलीत करणे, सदर कुटुंबियांची कोरोना चाचणी घेणे याबाबत सूचना दिल्या. तसेच समितीने विशेषत: जे लोक तोंडाला मास्क लावत नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करणे, सामाजिक अंतर ठेवणे, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करणे याबाबत सूचना दिल्या आहेत. सदरील कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस खात्याने सहकार्य करावे यासाठी विभागीय पोलीस अधिकारी श्री.पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन तेर येथे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यासंदर्भात सुचना आ. पाटील यांनी  दिल्या आहेत.

यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे, जि.प.बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, पंचायत समितीचे उपसभापती संजय लोखंडे, उपविभागीय अधिकारी रोडगे, तहसिलदार माळी, गटविकास अधिकारी श्रीमती दिवाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्यासह आशा सेविका, सर्व ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.


 
Top