तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथुन मराठा आरक्षणाच्या तिस-या पर्वाला सुरूवात झाली असुन दि. २२ सप्टेंबर रोजी सरस्वती मंगल कार्यालय घेण्यात आलेल्या मराठा आरक्षण हक्क परीषदेमध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही नोकरी भरती होऊ देणार नाही असे म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यानी मराठा आरक्षणाच्या तिस-या पर्वाचा एल्गार पुकारला आहे.

मराठा समाजाने आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी राज्यभर शांततेत ५८ मुक मोर्चे काढले व दोन ठोक मोर्चे वाढल्यानंतर मराठा आरक्षण मंजुर करण्यात आले. काही दिवसापुर्वीच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आणी राज्यातील मराठा समाज पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला त्याच अनुषंगाने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यानी मराठा आरक्षणाच्या तिस-या पर्वाची सुरूवात आई तुळजाभवानीच्या साक्षीने तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पुजन करून तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथुन केली.

तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालय येथे दि.२२ रोजी  मराठा आरक्षण हक्क परीषद घेतली. यामध्ये त्यानी सरकारवर हल्ला चढवत हिम्मत असेल तर अडवून दाखवा अशी गर्जना करत मराठा आरक्षणाच्या तिस-या पर्वाची हाक दिली. ही लढाई आरपारची लढाई असुन आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यानेच लढा देऊन हक्काचे आरक्षण घेणारच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही नोकरी भरती होऊ देणार नसल्याचे मराठा आरक्षण राज्य समन्वयक आबा पाटील यानी बोलताना सांगितले.

यावेळी मनोज गुंड, अण्णा गुंड, शहाजी लोंढे, जगन्नाथ गवळी, स्नेहाताई गावकर, वैष्णवी पाटील यानी आपले मराठा आरक्षणाविषयक विचार मांडले. या हक्क परीषदेसाठी तामलवाडीसह सुरतगाव, पिंपळा खुर्द, पिंपळा बु., वडगाव, उळे, बोबडेवाडी, सांगवी काटी आदी गावातील मराठा समन्वयक उपस्थित होते. यावेळी मंचावर माजी दत्तात्रय वडणे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, मुकुंद गायकवाड, मारूती पाटील, अण्णा गुंड, माजी सैनिक शिवाजी सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सर्जेराव गायकवाड यानी केले. 

श्री विष्णु महादेव चरणी आबासाहेब नतमस्तक 

मराठा आरक्षण हक्क परीषदेचे आबासाहेब पाटील हे तामलवाडी गावामध्ये येताच ते गावचे ग्रामदैवत तथा जागृत देवस्थान श्री विष्णु महादेव मंदीरात जाऊन श्री विष्णु महादेवाचरणी नतमस्तक झाले व लवकरात लवकर मराठा आरक्षण देण्याची सुबुध्दी सरकारला दे अशी प्रार्थना शिवचरणी केली.यावेळी तामलवाडी येथील वैष्णवी पाटील हिच्या हस्ते आबासाहेब पाटील याना तलवार भेट देण्यात आली. याप्रसंगी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाही देण्यात आल्या.


 
Top