तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील काक्रंबा, बारूळ, होनाळा, वडगाव लाख, खंडाळा, मोर्डा, तडवळा, जवळगा (मेसाई), कार्ला, काक्रंबावाडी, वाणेगाव, वडगाव देव, हंगरगा तुळ, सलगरा दि, किलज आदीसह अनेक गावाना गेल्या आठ दिवसा पासुन पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जेमतेम पावसाने या भागातील लहान मोठे नदी, नाले, तलाव, ओढे, बंधारे, विहिरी तुडुंब भरले आहेत.
मात्र बुधवार व गुरूवार रोजी मध्यराञी रात्रभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या भागातील सर्वच नदी, नाले, ओढे खळखळुन वाहत आहेत. तर तलाव देखील पूर्ण क्षमतेने तुंडुब भरून ओसंडुन वाहत असल्याने या परिसरातील मोठ्या तलावातील पाणी साठयात वाढ झाली आहे. परंतू खरीपातील काढणीला आलेल्या उडीद, सोयाबीन पिकासह कांदा रोपाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील सोयाबीन सह लागवड केलेले कांदा रोप पूर्णपणे वाहुन गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्याचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच गेली आठ दिवसापासुन पडत असलेल्या सततच्या पावसाने माञ सध्या खरीपातील काढणीला आलेले सोयाबीन, उडीद पिकाला पाणी लागून सध्या पिके पिवळी पडुन कोंब फुटत आहेत. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकाचे सध्या प्रचंड नुकसान झाले आहे. तुळजापुर शहराला पाणी पुरवठा करणारा पांचुदा तलावात ही मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला होता.


