उस्मानाबाद, दि. 11 :   महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन सोन्या-चांदीचे दागिने गायब केल्याप्रकरणी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकासह अन्य दोषी अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी दिले आहेत. या आदेशावर त्यांनी गुरुवार रात्री उशिरा स्वाक्षरी केली. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अनेक राजे राजवाड्यांनी मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, निजाम, औरंगजेब अशा मोठ्या घराण्यांनी दागिने अर्पण केल्याची नोंद तुळजाभवानी मंदीर संस्थानाकडे आहे.

श्री तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती. त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र देवून तातडीने कार्यवाही करण्याचे सुचित केले होते.  

त्याप्रमाणे आता मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदीर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसिलदार यांना प्राधिकृत करुन तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्याविरुध्द तुळजापूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहेत. शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. श्री तुळजाभवानी मातेचे हे गायब केलेले प्राचीन दागिने व 71 नाणी कोणाला देण्यात आले हे तपासात स्पष्ट होणार आहे.


 
Top