नळदुर्ग, दि. 17 : नळदुर्ग शहरात डेंग्यु सदृश्य तीन रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तात्काळ याबाबत उपयोजना करण्याची मागणी शहरवासियांतून होत आहे.
नळदुर्ग शहरात कोरोना, सारी पाठोपाठ आता डेंग्युचेही रूग्ण आढळुन आले आहेत. शहरातील एकाच घरातील दोन सख्या भावाना डेंग्युची लागण झाली आहे. तर अन्य एकाला डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू हा आजारही साथीचा असुन तो जीवघेणा आहे. त्यामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाने तात्काळ डेंग्युचा शहरात इतर भागात फैलाव होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात डेंग्युचा मोठ्याप्रमाणात फैलाव होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या शहरात घाणीमुळे डासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने डास नागरीकांना मोठ्याप्रमाणात चावा घेत आहेत. त्यामुळे डासांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेने शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी करून संपुर्ण शहर निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने सध्या ज्या भागात डेंग्युचे रूग्ण आढळुन आले आहेत त्या भागातील नागरिकांचा सर्व्हे करून त्यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.


