तुळजापूर, दि. 21 : नगरपरिषदेच्यावतीने तुळजापुर शहरात दि. 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र हा लॉकडाऊन जनतेच्या मनाविरुध्द असून यात व्यापारी व सर्वसामान्यांचे नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे सदरील लॉकडाऊन रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी तुळजापुर तहसिलदार मार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी तुळजापूर मनसेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मार्च ते आजतागायत वेळोवेळी काही निर्बंध घालून लॉकडाऊन केलेला आहे. गेल्या महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून अनलॉक प्रक्रिया सुरु केलेली आहे. या अगोदरच चार ते पाच महिने संपूर्ण लॉकडाऊन असल्याने व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. ते कुठेतरी आता अनलॉकचे पालन करत पुर्वस्थितीवर येत असताना मात्र तुळजापुर शहरात न.प. ने आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदरील निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होणार आहे.
सदरील लॉकडाऊन करताना तुळजापूर वासियांना तसेच व्यापारी वर्गाला कोणतीही पूर्व कल्पना न देता लॉकडाऊन बळजबरीने लादण्यात आल्याचे आरोप करुन पुढे म्हटले आहे की, सदर आठ दिवसांचे होणार लॉकडाऊन रद्द करण्यात यावे, अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करुन सर्व व्यापारी व तुळजापूर वासियांना सोबत घेवुन नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आलेला आहे.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष धर्मराज सावंत, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, उमेश कांबळे, विशाल माने, झुंबर काळदाते यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
