उमरगा, दि. 12 : सोलापूरहून हैदराबादला निघालेल्या कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उमरगा शहराच्या वळणावर हा अपघात झाला. दरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या लोकांना प्रदिप चौधरी यांनी मोठ्या धाडसाने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
याबाबतची माहिती अशी की, सोलापूर येथून तीन प्रवाशी घेऊन हैदराबादला निघालेल्या स्विफ्ट कारला उमरगा शहराच्या वळण मार्गावर त्रिकोळी जाणाऱ्या रस्त्याजवळ ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात बँक कर्मचारी सिताराम राजू वय ४५ रा. हैद्राबाद गंभीर जखमी झाले. त्यांना योगेश तपसाळे, प्रदिप चौधरी यांनी स्वखर्चातुन सोलापूरला उपचारासाठी पाठविले. नंदरु श्री सत्य माधव वय २९ रा. तडीगडप्पा (आंध्र प्रदेश) याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सोलापूर जिल्हात बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला व किरकोळ जखमी झालेला एन. शिवशंकर रा. हैद्राबाद याला वहान करून गावी पाठविण्यात आले. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याचे नाव उपलब्ध होऊ शकले नाही.