तुळजापूर : कुमार नाईकवाडी
काटी ता. तुळजापूर येथील बँकेत एका शेतक-याने वारंवार चकरा मारुनही पिककर्ज मंजूर करण्यास दिरंगाई केली. अचानकपणे कर्ज मंजूर करता येत नाही असे म्हणून बँकेतुन हाकलून दिल्याने संबंधित शेतक-यास मनस्ताप झाल्याने या प्रकरणी संबंधितांविरुध्द कारवाई करावी व पिकविमा मंजूर करुन द्यावा अन्यथा दि. 17 सप्टेंबर रोजीपासुन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अण्णासाहेब दशरथ माळी या शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माझी शेती सावरगाव येथे दोन हेक्टर असुन दि. 16 जून रोजी बँक आँफ महाराष्ट्र शाखा काटी येथे पिककर्ज कर्जाची फाईल जमा केली. यापुर्वी मी कुठल्याही बँकेकडे कर्ज मागणी केली नव्हती. दि. 16 जुन ते दि. 4 सप्टेंबर या कालावधीत बँकेत सतत चकरा माराव्या लागल्या. दि. 4 सप्टेबरला अचानक पणे तुम्हाला कर्ज देता येत नाही म्हणत बँकेतुन हाकलुन दिले असे नमूद करुन संबंधितांवर कारवाई करावी व पिककर्ज मंजूर करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णासाहेब माळी यांनी म्हटले आहे.