काटी :  उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि. 24 रोजी दुपारी पेशाने शिक्षक असलेल्या मुबीन बडेसाब शेख व मुबीना महिबुब शेख या मुस्लिम नवदाम्पत्याचे लग्न साखरपुड्यातच अवघ्या दोन तासातच उरकले.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काटी गावात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दावते इस्लाम सामाजिक संस्थेत कार्यरत असलेले अरबी शाळेतील शिक्षक मुबीन बडेसाब शेख आणि त्यांचे कुटुंबीय काटी येथील आचारी महिबुब अंबीर शेख यांची कन्या मुबीना शेख यांना पहाण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता काटी येथे आले. मुलगी पहाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. लगेच मुफ्ती इर्शाद बागवान, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, अहमद पठाण, करीम बेग, माजीद इनामदार, हुसेन पठाण, अफजलखान पठाण आदी   उपस्थित मान्यवरांनी सध्या कोरोना व्हायरसमुळे गर्दी करता येणार नाही,कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. असे दोन्ही बाजूकडील मंडळींना समजावून सांगत मध्यस्थी करून तातडीने साखरपुड्यात दुपारी तीन वाजता लग्न सोहळा उरकण्यात आला. मुलगी पहायला एक वाजता आले व तीन वाजता साखरपुड्यासह विवाह सोहळा अवघ्या दोन तासातच वधुवरांचे आई-वडील व ठराविक पाहुणे व मित्रांच्या उपस्थित अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला़ यासाठी अवघा सहा हजार रुपये खर्च आला. विशेष म्हणजे मुलाकडील मंडळीने हुंडा न मागता उलट मुलीलाच दिड तोळ्याचे दागिने घातले.

   केवळ पाहुण्यासह उपस्थित पन्नास पाहुण्यांना साधे जेवण लग्नांमध्ये देण्यात येऊन हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाने जगभरातील स्थिती बिघडवून टाकली आहे़ आपल्या विवाह सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे पाहुण्यांना त्रास नको या भावनेतून हे शुभमंगल उरकण्यात आले़ यात कसलीही खरेदी नाही, बस्ता नाही, वाजंत्री, घोडे नाहीत, पाहुणे रावळे यांचा मानपान नाही. मात्र सर्वांचाच उत्साह हा जोरात होता असा अभूतपूर्व लग्न सोहळा केवळ आणि केवळ कोरोनामुळेच घडला असल्याची चर्चा सर्व गावभर सुरू होती.

या लग्न सोहळ्याप्रसंगी मुफ्ती इर्शाद बागवान, पत्रकार उमाजी गायकवाड, करीम बेग, अजय देशमुख, कय्युम कुरेशी, हुसेन खान पठाण, अफजलखान पठाण, माजीद, महिबुब, अहमद पठाण,रशिद नाईकवाडी, जुबेर शेख, फिरोज पठाण,मुनाब पठाण, तबारक इनामदार, हमीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top