तुळजापूर, दि. 16 : शहर व परिसरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने ३०० खाटांचे कोविड केयर सेंटर उभारण्यात येत असून ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १०० खाटा असणार आहेत. या सेंटरला तेरणा ट्रस्ट मार्फत डॉक्टर्स उपलब्ध करण्यात येणार असून जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भविष्यातील गरज ओळखून उस्मानाबाद येथील तेरणा कोविड केयर सेंटरची क्षमता १५० खाटांनी वाढवून ३५० करण्यात येणार असल्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
सदर इमारत ही प्राधिकरणाच्या मालकीची असून त्यांनी भक्त निवासासाठी तुळजापूर नगरपरिषदेकडे हस्तांतरीत केली आहे. या जागेवर सुपर स्पेशालिटी दवाखाना उघडण्याबाबत नियोजन चालू आहे. मात्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आपल्या सूचनेवरून सदर इमारत तात्पुरती कोविड केयर सेंटरसाठी वापरण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यात डॉक्टर्सच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने तेरणा ट्रस्ट मार्फत यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर्स देण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला आहे.
