उमरगा : सुरज अबचाने
छत्रपती संभाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानचे आराध्यदैवत आहेत. महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. परंतु काही उत्पादक मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून बिडी या मादक पदार्थाचे उत्पादन करून विक्री करत आहेत. मराठी जनतेस ते पटण्यासारखे नाही. याविषयी वारंवार निवेदने व चर्चा करून देखील संबंधित कंपनी उत्पादनाचे नाव बदलण्यास तयार नाही. यापुर्वी महाराष्ट्र राज्यातील अनेक शिवप्रेमी, छत्रपती संभाजीराजे प्रेमी कार्यकर्ते व संघटनांनी पाठपुरावा केला आहे. परंतू आजवर यात बदल झालेला नाही. याबाबतीत तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करावी, या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेना उमरगाच्यावतीने मुख्यमंत्री यांना उमरगा तहसीलदारांमार्फेत निवेदन देण्यात आले.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे उमरगा तालुकाध्यक्ष विष्णु भोसले, शहराध्यक्ष सुमित घोटाळे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अमोल पाटील, आय टी सेलचे शैलेश लोखंडे, तालुका उपाध्यक्ष अर्जुन मुर्टे, तालुका कार्याध्यक्ष बाळराजे शिंदे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.