नळदुर्ग, दि. 09 : शहरातील इंदिरानगर येथे अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने "रस्ता असून अडचण नसून खोळंबा" याप्रमाणे आहे. अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांना तो अडचणीचा ठरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी युवासेनेच्यावतीने नळदुर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नळदुर्ग नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्वे नंबर 236/1 मधील जय मल्हार नगर खंडोबा रोड नारायण घोडके ते अशोक मुरमे यांच्या घरापर्यंत असलेला सिमेंट रस्ता मागील दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. कच्चा रस्ता तयार करून त्यावर डबर टाकण्यात आले आहे. त्यामुळे ये-जा करणा-या नागरीकांना मोठी अडचण होत आहे. नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे आज ही समस्या निर्माण झाली आहे. अर्धवट काम ठेवणा-या ठेकेदारावर तात्काळ कडक कारवाई करून पुनश्च एकदा निविदा काढून त्याची निवीदा ऑनलाईन करून तो रस्ता नव्याने तयार करण्याची मागणी युवासेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार सुनील बनसोडे, चर्मकार संघटेनेचे शहराध्यक्ष शंकर वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना गायकवाड, रामेश्वर घोडके, नवनाथ घोडके अशोक साधू, नारायण घोडके, अमोल घोडके, सचिन घोडके, परमेश्वर घोडके, किशोर घोडके, महेश घोडके, सचिन शिंदे, राहुल घोडके, शमशुद्दीन शेख, महादेव माने आदीजण उपस्थित होते.