नळदुर्ग, दि. 10 : 

नळदुर्ग येथे रखडत पडलेल्या उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याबाबत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यास यश आले असून दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून तीस बेडची सुविधा असलेले (दोन विंग) रुग्णालय सुरु करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

नळदुर्ग व परिसरातील जवळपास 60 गावांतील नागरीकांसाठी सोयीचे ठरणारे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम अनेक वर्षापासून सुरु आहे. हे काम निधीअभावी रखडले होते. त्यामुळे वेळेवर सुरु होवू शकले नाही. सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग वाढत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच नळदुर्ग व परिसरातील रुग्णांना तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर याठिकाणी जावून उपचार करणे गैरसोयीचे व वेळकाढूपणाचे ठरत असल्याने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी निवेदन देवून रुग्णालय सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दया व तातडीने रुग्णालय सुरु करण्याची मागणी केली होती.  त्यानंतर माजी मंत्री चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वत: माजी मंत्री चव्हाण यांना फोन करुन नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले. 

त्यानुसार आज गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भेट दिली असता यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गपाट, संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी पाटील व संबंधित उपस्थित होते. यावेळी रुग्णालय सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दि. 2 ऑक्टोबर रोजी तीस बेडची सुविधा रुग्णसेवा सुरु करण्यात येणार आहे. याप्रकरणी लवकरच उस्मानाबाद येथे सिव्हिल सर्जन यांची भेट देवून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री चव्हाण यांनी सांगितले. 

यावेळी नगरसेवक शहबाज काझी, बसवराज धरणे, शिवाजीराव मोरे, सुभाष कोरे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, दत्तात्रय दासकर आदीजण उपस्थित होते.


 
Top