काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी हद्दीत उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यच्या सिमेवर बार्शी तालुक्यातील कासारी येथील शेतकरी हरि भोरे यांची गट नं 139 मध्ये सोळा एकर शेतजमीन आहे. या सोळा एकरात 2004 मध्ये एक पाझर तलाव मंजूर झाला. या पाझर तलावात सुमारे सव्वा दहा एकर या पाझर तलाव प्रकल्पात गेली. संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी या शेतकऱ्यांचे  मागील सोळा वर्षांपासून उपविभागीय जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. 

या दरम्यान एक वेळा हरि भोरे यांनी जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने व घरातील आर्थिक अडचणींमुळे हरि भोरे जगण्यासाठी बाहेर गावी गेल्यानंतर भाऊ,आई वडिलांचा तेथे दुर्दैवी मृत्यू झाला. या नैराश्यातून जमीन संपादित शेतकरी हरि मोरे यांनी शेतामध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तलाठ्यापासून कलेक्टर व आमदार, खासदार पासून मंत्र्यापर्यंत जमिनीचा मावेजा मिळविण्यासाठी निवेदनाद्वारे अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु सोळा वर्षांनंतरही या गरीब भोरे कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र चिटणीस संपतराव दगडू धेंडे यांनी बुधवार दि.(30) रोजी दुपारी 12 वाजता त्याच ल.पा. पाझर तलावात आत्मदहन करणार असल्याचा इशारा संबंधित विभाग व प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता. 

बुधवारी सकाळी 11:30 वाजता आत्मदहनस्थळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी जी.एस. होळकर, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध जमादाडे यांनी आंदोलनकर्ते संपतराव दगडू धेंडे यांच्याशी चर्चा करून भुसंपादन कार्यालयामार्फत मावेजासाठी करण्यात आलेल्या प्रकियेचा अहवाल दाखवून जलसंधारण कार्यालय जलद गतीने मावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून भूसंपादनासाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच प्राधान्याने तलावातील बाधित शेतकऱ्यास मावेजा देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा.) उस्मानाबाद ए.सी. कदम यांच्या सहिनिशी दिले. लेखी आश्वासनानंतर संपतराव धेंडे यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले.

 यावेळी जलसंधारण विभागाचे जी.एस. होळकर, आंदोलक संपतराव धेंडे, तुळजापूर ल.पा.चे उपअभियंता बी.एस.जगताप, मंडळ अधिकारी एस.जी. शिंदे, तलाठी एन.एस. काशिद, आदीसह शेतकरी उपस्थित होते.

 
Top