प्रतिकात्मक

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावात जिओ फोनचे असंख्य ग्राहक असून गेल्या पाच-सहा महिन्यापासून मोबाईलला नेटवर्क व्यवस्थित येत  नसल्यामुळे जिओ फोन नावाला रेंज नाही गावाला अशी म्हणण्याची दुदैवी वेळ येथील ग्राहकांवर आली आहे. 

रिलायन्स ग्रुपने मोठा गाजावाजा करत आणि स्कीम  भडीमार करत ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढले. कंपनीच्या अमिशाला बळी पडून ग्राहकांनी जिओ ला जवळ केले. मात्र, काही महिन्यांनी जिओ कंपनीने ग्राहकांना परवडणा-या स्कीम बंद केल्या असून रिचार्ज प्लॅनच्या रक्कमेत भरमसाठ वाढ केली आहे. महिन्याचा रिचार्ज वाढवूनही सेवा योग्य पद्धतीने मिळत नसल्यामुळे ग्राहक वैतागले आहेत.  

सध्या शाळा कॉलेज बंद असून शाळा कॉलेज चा पूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. मात्र या गावातील परिसरात जिओ कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी छताचा, टेकडीचा, झाडाचा, आसरा घ्यावा लागत आहे. नेटवर्कचा अंदाज घेत रात्रभर जागून अभ्यास करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून विद्यार्थी व मोबाईल ग्राहकांची होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

गेल्या तीन वर्षापासून मी जिओ कंपनीचा ग्राहक आहे. यापुर्वी गावात व्यवस्थित रेंज येत होती. मात्र गेल्या वर्षापासून रेंज गायब झाली आहे. मी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असून अनेक कामे ऑनलाईन करावी लागतात. घटनास्थळांवर जाऊन लोकेशनचे फोटो घ्यावे लागतात. मात्र, गावात रेंज नसल्यामुळे जियो टॅगिंग होत नाहित. त्यामुळे गावकर्‍यांना अनेक शासकिय योजने पासून वंचित रहावे लागत आहे.

- शंकर सावंत, रोजगार सेवक पांगरदरवाडी.

संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अन्यथा भविष्य काळात आंदोलन करावे लागेल.

- बापू साळुंके, नागरिक पांगरदरवाडी 


 
Top