चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापुर तालुक्यातील चिवरी व परिसरात गेल्या चार दिवसापासून सतत संततधार पाऊस होत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली सोयाबीन पीक हातची जाते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे सोयाबीन ची उत्पादन धोक्यात आली असून शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
यंदा निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार तिबार पेरणी, रोगाच्या प्रादुर्भावामुळे, खर्चिक फवारणी, त्यात कोरोनाचे लॉकडाऊन, नापिकी, शेतमालाला अत्यल्प भाव, शेतमालाचे नुस्कान आणि पिक कर्ज पुरवठा न होणे अशा संकटाचा सामना करत असतानाच आता काढणीला आलेल्या व हिरव्या सोयाबीनच्या शेंगाना मोड येऊन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात खरीपाची पेरणी केली. परंतु कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुरेसा पाऊस पडल्याने पिके चांगली बहरली. पण त्यानंतर तुळजापूर तालुक्यात एक महिना पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पीक जाग्यावरच होरपळून गेली. तसेच मध्यंतरी लष्करी आळी व करपा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन पिकास शेतकऱ्यांनी कशी बसे जगवली. पण शेवटी निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ काही सोडायला तयार नसून सलग पावसाने सोयाबीनचे शेंगांना मोड फुटल्यामुळे तालुक्यातील मृग नक्षत्रात पेरणी केलेली हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे उत्पन्न धोक्यात आले आहे.
तालुक्यात नगदीचे पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची मोठी पसंती आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर यंदाही सोयाबीनची सुगी गतवर्षीच्या सुगी सारखीच हातची जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी आता निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाली आहेत. पावसाची स्थिती अशीच राहिली तर पेरणी वर काढण्यासाठी तसेच मशागतीसाठी केलेला खर्च हा पाण्यात जातो काय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
