नळदुर्ग, दि. 29 : तुळजापूर तालुक्यातील हगलुर येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर तुळजापूर पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ॲड. जयपाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हगलुर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समितीमधील कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ॲड. जयपाल पाटील यांच्यावतीने फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना तांबोळी म्हणाले की, माझ्या प्रशासक पदाच्या कार्यकाळात गावच्या प्रश्नासंबंधी पुढाकार घेणार असून प्रश्न सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करणार आहे. तसेच आठवडयातून एकदा दर बुधवारी गावात हजर राहणार असून ग्रामस्थांना काही अडचणी असल्यास लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना ॲड. जयपाल पाटील म्हणाले की, गावात तलाठी येत नाहीत, त्यांनी गावासाठी एक वार दिला पाहिजे. तसेच राज्याचे राज्यपाल भेटतील पण गावचे तलाठी लवकर भेटणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे ग्रामसेवक व तलाठी यांनी गावात राजकारण न करता विकास कामाकडे लक्ष द्यावे, गावातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत, असे सांगुन गलूर गाव शंभर हागणदारी मुक्त झाले पाहिजे, गटार व्यवस्था करणे, सांडपाणी नियोजन करणे यासह नागरी समस्या नूतन प्रशासक तांबोळी यांच्याकडे ॲड. पाटील यांनी मांडल्या.

याप्रसंगी माजी सरपंच नालंदा पाटील, गावातील युवा नेतृत्व ॲड. जयपाल पाटील, अण्णासाहेब दराडे, विजय नागरगोजे, महेश गवळी, सतीश दराडे, गणेश घुगे, अनंता दराडे, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top