मुंबई, दि. 3 : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडबाबत कलम 188 नुसार 2 लाख 74 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 29 कोटी 37 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.  राज्यात 22 मार्च ते 2आक्टोंबरपर्यंत कलम 188 नुसार 2,73,604 गुन्हे नोंद झाले असून 39, 004 व्यक्तींना अटक करण्यात आली. तर 96,532 वाहने जप्त करण्यात आली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 37 लाख 76 हजार 782 रुपये दंड आकारण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २२५ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २५० पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

 
Top