उमरगा, दि. 10 : दाळींब ता. उमरगा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या शास्त्रीनगर तांडा येथे शनिवारी (दि. 10) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले. यावेळी वीज पडून एक गाभण म्हैस, वासरु जागीच ठार झाले.
शास्त्रीनगर तांडयातील रहिवाशी असणारे शेतकरी रामा खुबा राठोड हे शनिवारी म्हैस व गायीचे वासरु शेतातील बाभळीच्या झाडास बांधुन सोयाबीन काढणीस गेले होते. अचानक दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वीजांचा कडकडाट व मेघगर्जना होवून जोरदार पावसास सुरुवात झाली. राठोड हे बाभळीच्या झाडाखाली म्हैस व वासरुला सोडण्यासाठी जात असताना अचानक वीज झाडावर पडून म्हैस व वासरु जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना दिली.
अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधव त्रस्त असतानाच अचानक आज नैसर्गिक आपत्तीमुळे म्हैस व वासरु मृत्यमुखी पडल्याने शेतक-याचे नुकसान झाले असून याबाबात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी प्रशासनाने शेतक-यास तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.
