काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर  तालुक्यातील काटी येथे रविवार दि. 25 रोजी येथील भिमनगरमधील नालंदा बुध्दविहारमध्ये 64 वा  धम्मचक्र प्रवर्तन दिन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर 1956 रोजी पाच लाख बुद्ध अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला आज 64 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून काटी येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने येथील नालंदा बुध्द विहारात  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र नंदू बनसोडे यांनी केले तर आभार गौतम बनसोडे यांनी मानले. यावेळी रमाई महिला मंडळाच्या सदस्या अनुसया बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शेवटी मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी दलित मित्र नंदू बनसोडे, गौतम बनसोडे, तानाजी सरोदे, शिवपाल घोंगडे, धनाजी बनसोडे, अक्षय बनसोडे, हरहंत सरोदे, अनुसया बनसोडे, उंबराबाई साबळे, जाई साबळे, ताई सुरते, रंजना शेरखाने, सोजरबाई बनसोडे आदींची उपस्थिती होती.

 
Top