नळदुर्ग : एस.के.गायकवाड
सलग तीन दिवस पडलेल्या संततधार जोरदार पावसामुळे बालाघाट पर्वत रांगेतून वाहणा-या तुळजापूर तालुक्यातील बोरी नदीला आलेल्या महापुराने रौद्ररुप धारण केल्याने नदीकाटच्या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सलग तीन नळदुर्ग व परिसराला परतीच्या पावसाने झोडपुन काढल्याने बोरी नदीला महापूर आला. नळदुर्ग बोरी नदीचा सांडवा एका मोठ्या धबधब्यासारखा वाहू लागला. येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नरमादी धबधब्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागने नरमादी धबधबे आणि पुलावरून जाणारे पाणी एक होऊन एका महा धबधब्याचे स्वरूप तिथे निर्माण झाले.
धबधब्याचे पाणी, नळदुर्ग येथील उच्चपातळी बंधाऱ्याचे पाणी, लोहगाव शिवारातील खंडाळा धरणाच्या सांडव्याचे पाणी, ओढे, नाल्याचे पाणी, साठवण तलाव्याचे पाणी पाणी बोरी नदीला मिळाल्याने बोरी नदीच्या पुराचे महापुरात रूपांतर झाल्याने बोरी नदीने रौद्र रूप धारण केले. परिणामी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, येडोळा, वागदरी, दहिटणा व परीसरात सर्वत्र नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात महापुराचे पाणी घुसून सोयाबीनचे ढीग पुरात वाहून गेले. वागदरी येथील धनू बिराजदार, सिद्राम बिराजदार यांच्या सोयाबीनच्या मोठ्या बनीमी तर शेषराव बिराजदार यांचे मळून रास करून ठेवलेले सोयाबीनचे २१ पोते पाण्यात वाहून गेले.
अनिल गोगावे, राजेंद्र गोगावे, अमोल गोगावे यांची पुर्ण शेतजमीन पाण्याखाली जावून ऊसाचे व सोयाबीनचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले. येडोळा गावालगत नदीवर असलेला केटी बंधारा पुरामुळे उध्दवस्त झाल्याने येडोळा गावचा नळदुर्गचा संपर्क तुटला आहे. बोरी नदीवर वागदरी शिवारात असलेले चार बंधारे पाण्यात वाहून गेले. तर दहिटणा गावात पुराचे पाणी घुसून घराघरात पाणी शिरले. आहे त्या आवस्थेत घरेदारे सोडून जीव वाचवण्यासाठी लोकांनी उंचीवर असलेल्या झोपडपट्टीचा आसरा घेतला. परंतु घरात पाणी गेल्याने अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त दहिटणा गावाला आमदार राणाजगजीतसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, युवानेते सुनिल चव्हाण आदीनी भेट देवून सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित महसूल विभागास देवून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल असे सांगितले.

