तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायतीने चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून गावातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी खरेदी केली होती थोड्या दिवस घंटागाडीमध्ये गल्लोगल्ली जाऊन कचरा उचलून बाहेर टाकण्यात येऊ लागला परंतु गेली दोन महिन्यापासून घंटागाडी एकाच जागी बसून आहे. रस्त्यावरच कचरा साचत असल्याने घंटागाडी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. 

तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने  गावामध्ये स्वच्छता रहावी या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून घंटागाडी खरेदी करण्यात आली तसेच ५० डस्टबिनही खरेदी करण्यात आले होते. सुरूवातीला रस्त्यावर ठेवलेल्या डस्टबिनमधुन कचरा गावाबाहेर टाकण्यात येऊ लागल्याने गावामध्ये स्वच्छता राहु लागली परंतु कालांतराने रस्त्यावरील सर्वच डस्टबिन गायब झाले. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी गल्लोगल्ली फिरुन कचरा उचलु लागली. उचललेला कचरा गावाबाहेर टाकण्यात येऊ लागला परंतु गेली दोन महिन्यापासून घंटागाडी बंद असल्याने रस्त्यावर कचरा पडत असुन गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरत आहे. अगोदरच जनता कोरोनाने हैराण झाली असताना घंटागाडी बंद असल्याने व सध्या दसरा सणामुळे घर स्वच्छ करण्याची लगबग सुरु असताना ऐन दसरा काळात घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकण्यात येत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असून रोगराईला आमंत्रण मिळत आहे. लवकरात लवकर घंटागाडी पुर्ववत चालू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

अडवणूक होत असल्याने घंटागाडी बंद - लाटकर

गावातील कचरा घंटागाडी मध्ये घालून तलावाच्या बाजुच्या जागेमध्ये टाकण्यात येत होता परंतु तेथील शेजारी असलेल्या शेतकर्यांनी तिथे कचरा टाकण्यास मनाई केल्याने घंटागाडी बंद असल्याचे ग्रामविकास अधिकारी पी. एन. लाटकर यांनी सांगितले तसेच लवकरच यावर तोडगा काढुन घंटागाडी पुर्ववत चालू करण्यात येईल असेही लाटकर यांनी  बोलताना सांगितले.


 
Top