उस्मानाबाद : नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे बुधवारी (दि.१४) निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक), वाघोली, सकनेवाडी, शिंदेवाडी, सांजा, बरमगाव, मेडसिंगा, राजुरी, चिखली, काजळा, दारफळ, बोरगाव (राजे), महाळंगी, पंचगव्हाण आदींसह विविध गावास परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. पाडोळी महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतशिवारासह गावांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच उभे असून काही जणांनी मळणीसाठी ढिग घालून ठेवले आहेत. मात्र उभ्या पिकात पाणी असून ढिगाऱ्याखालीही पाणी गेल्याने भिजून नुकसान झाले आहे. तसेच फळबागांनाही याचा जबर फटका बसला असून ऊसाचे फडही भुईसपाट झाले आहेत.  शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांसोबत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांची स्वाक्षरी आहे.

 
Top