जळकोट : मेघराज किलजे 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळकोट व परिसराला पावसाने अक्षरशः पंधरा तास धुमाकूळ घातला. पावसाच्या या हाहाकारामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी बारा वाजण्याच्या सुमारास थांबला. जळकोट मंडळात जवळपास मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

गेल्या आठ दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी दिवसभर पाऊस पडला. सोमवारी दिवसभर उसंत घेतल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. मुसळधार  ते अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

जळकोट व परिसरातील शिवारात गुडघाभर पाणी साचले होते. सोयाबीन काढणीचा हंगाम असल्याने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून रानावर ढीग रचले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून रानावर वर टाकले आहे. सोयाबीन पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जळकोट व परिसरात शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस पीक पूर्णतः आडवा झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे. शिवारा- शिवारातील ऊस आडवे पडल्याने ऊस पीक पूर्णत: पाण्यात दिसत आहे. जळकोट व परिसरातील सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

या अति प्रचंड पावसामुळे अनेक गावातील पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जळकोट येथील गावातील जुन्या भिंती पडल्या आहेत. जळकोट येथील वड्याचे पाणी मारुती मंदिरापर्यंत होते. यामुळे भीम नगरचा पूल पूर्णतः पाण्यात आहे. गावा शेजारी असलेले शेती पूर्ण पाण्यात आहे. मुबारक जमादार, कासिम जमादार, अब्दुल जमादार, महताब जमादार व मोहन राठोड आदि शेतकऱ्यांची शेती  पूर्ण पाण्याखाली आहे. या पावसाच्या हाहाकारा मुळे शेतकरी पूर्ण खचला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत व  त्वरित नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी जळकोट व परिसरातील शेतकरी वर्ग मधून केली जात आहे.

 
Top