नळदुर्ग, दि. 14 : परतीच्या पावसाने रौद्र रुप धारण केल्याने नळदुर्ग व परिसरात सर्वत्र हाहाकार उडाली. शहरातील बोरी नदी काठचा भाग जलमय झाल्याने 30 ते 35 घरात पाणी शिरले. तर 25 वर्षानंतर प्रथमच येथील ऐतिहासिक किल्ल्यातील पाणी महालावरुन पुराचे पाणी वाहत आहे. माञ कोरोनामुळे पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंदी असल्याने पर्यटकाविनाच किल्ल्यातील धबधबे वाहत आहेत. 

गेल्या चार दिवसापासून सर्वत्र दमदार पाऊस पडत आहे. त्यातच मंगळवारी राञी दहानंतर बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सलग मुसळधार पावसाने झोडपून काढले. सर्वत्र छोटे, मोठे तलाव, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे विविध गावाला जोडणा-या रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी दुपारनंतर सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील नळदुर्ग येथील आलियाबादच्या नवीन पुलावर पाणी आल्याने दुचाकी, तीनचाकी, कारची रहदारी थोडावेळ खोळंबली होती. रामतीर्थ उच्चपातळी बंधा-याचे दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी बोरी नदीतून गेल्याने नदीकाठच्या अनेक शेतक-यांच्या विद्युत मोटार पाण्यात बुडून नुकसान झाले.

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील पाणी महालावरून तब्बल पंचवीस वर्षानंतर पाणी ओसंडून वाहू लागल्याने प्रेक्षणीय व डोळयाचे पारणे फेडणारा हा धबधबा सायंकाळी रौद्ररुप धारण केल्याचे दिसून आले. अनेक हौशी पर्यटक नळदुर्ग  किल्ला पाहणीसाठी येत आहेत. मात्र आत प्रवेश नसल्यामुळे धबधबा न पाहताच परतावे लागत आहेत. पर्यटक येण्याची शक्यता असल्यामुळे किल्ल्यात सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  किल्ला प्रवेश बंद असल्यामुळे शहरालगतचा रामतीर्थ येथील नैसर्गिक धबधबा व उच्च पातळी बंधारा पाहण्यासाठीही शहरातील असंख्य नागरिक गर्दी करत आहेत.

मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. धरणातील पाणी सांडव्याद्वारे बोरी नदीतून नळदुर्ग शहराच्या उत्तरेकडून वाहत किल्ल्यातून जातो. बोरी नदीच्या काठावर असलेल्या शहरातील मराठा गल्ली व गवळी गल्लीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता अचानक पाणी पातळीत वाढ होवून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तुकाराम जाधव, अण्णा जाधव, बांधा जाधव, देविदास जाध‍व, मच्छिंद्र जाधव, शिवराम नागणे, खंडू नागणे, अमित नागणे, पांडुरंग नागणे, नागनाथ नागणे, महादेव जाधव, शंकर जाधव, रामकृष्ण महाबोले, बालाजी सुरवसे, गंगाधर सुरवसे, बाबू सुरवसे, गणेश मोरडे, सुनिल गव्हाणे, महालिंग स्वामी,‍ यांच्यासह 30 ते 35 जणांची घरे पाण्यात गेली असून अनेक कुटूंबीये सुरक्षित स्थळी गेली आहेत. काहींच्या घरातील धान्य व संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाल्याची माहिती खंडू नागणे यांनी बोलताना दिली.

 
Top