काटी : उमाजी गायकवाड 

परतीचा पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह काटी, सावरगाव, सुरतगाव, तामलवाडी परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असून सर्वत्र पाझर तलाव, ओढे, नाले, तुडुंब भरले असून येथील कासार वडा लघु पाझर तलाव तुडूंब भरल्यामुळे व तलावाच्या मध्यभागी भेगा पडल्याने धोका निर्माण झाला आहे. 

रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळते. याचा फटका शेतीला बसला आहे. अनेकांचे सोयाबीनचे बुचाड लावलेले काड पाण्यात  गेले असून दोन शेतकऱ्यांचे गंज लावलेले काड ताडपत्रीसह ओड्यात वाहुन गेले आहेत. येथील शेतकरी द्राक्षबागायतदार नाबाजी ढगे यांच्या साडेसहा एकरावरील द्राक्षबागेत पाच फूट पाणी उभारले आहे. तर येथील सिकंदर कुरेशी यांच्या ओड्याच्या कडेला असलेल्या शेतातील जनावरांच्या गोठा पाण्यात बुडाल्याने सहा जनावरे दगावली असण्याची शक्यता आहे. येथील सावरगाव व वाणेवाडी रस्त्यावरील शेतकऱ्यांचा गावाचा संपर्क तुटला असून शेतकरी अडकून पडले आहेत. तर ओड्याच्या कडेच्या शेतजमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

अजून काही दिवस पावसाचा इशारा असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे खळखळून वाहत आहेत. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न मिटला तरी यंदा बहरून आलेल्या पिकांचं परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पीक भिजली होती. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी पीक काढून शेतात झाकून ठेवली होती. परत मागील तीन दिवसात पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे काढून ठेवलेलं पीक नेता येत नाही. त्यामुळे सोयाबीन सारखे पीक काळे पडण्याची भीती आहे. 

बुधवारी रात्री दहा वाजता सुरू झालेल्या पावसामुळे जवळपास तब्बल अठरा तास  पडलेल्या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. असा पाऊस कधीही पाहिला नसल्याची जाणकार शेतकरी सांगत होते. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. तर जुने माळवदाच्या घराना गळती लागल्याचे चित्र होते. पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

 
Top