तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 17 ऑक्टोबर पासुन प्रारंभ होत असून नवरात्र महोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सुचना मंदीर संस्थानमार्फत लागु करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार भाविकांना वाहनाने किंवा पायी चालत तुळजापुरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोणत्याही मंडळास भवानी ज्‍योत घेऊन जाण्यासाठी शहरात प्रवेश नाही, यासह इतर मार्गदर्शक सुचना लागु करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे आहे :-

1. सदर कालावधीत मेळाव्यामध्ये/समारंभामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.

2. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी बंद राहतील.

3. सार्वजनिक मेळावे व समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील

4. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.

5. वरील संदर्भीय परिपत्रकान्वये साथीच्या आजाराची गांभिर्यता लक्षात घेऊन श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 2020 अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

6. भक्तांना व भाविकांना दर्शनासाठी श्री क्षेत्र तुळजापुर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही.

7. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता तुळजापुर शहरातील जनतेस किंवा भाविकास महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

8. सदर कालावधीमध्ये भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास, भाविकास श्री क्षेत्र तुळजापूर शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

9. श्री देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात पुर्वापार प्रथेप्रमाणे होणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजा-यासाठी आवश्यक असणारे पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. सदर परवानगी उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी, तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी व मंदिर तहसिलदार यांच्या मान्यतेने देण्यात येईल.

10. कोविड-19 या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सदर कालावधीत मंदीर संस्थानकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा तपासणीसाठी अवलंब केला जाणार आहे.

11. दैनंदिन निर्जुंतकीकरण, सामाजिक अंतराचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर सर्वांसाठी बंधनकारक राहील.

12. या कालावधीत मंदिरात किंवा मंदीर परिसरात मद्यपान, पान, गुटखा, तंबाखू इत्यादी तत्सम पदार्थाची सेवन करता येणार नाही.

13. घरी रहा सुरक्षित रहा या संकल्पनेतुन शारदीय नवरात्र महोत्सवात भाविक भक्तांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन www.shrituljabhavani.org या मंदिर संस्थानच्या अधिकृत संस्केतस्थळावरुन घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदीर संस्थानने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


 
Top