हन्नुर : नागराजे गाढवे   

अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर परिसरात  वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने दर्शनाळ येथील हरणा नदीला पूर आला असून सहा गावांचा संपर्क तुटला आहे. 

हन्नुर परिसरात बुधवारी पहाटे एक ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सलग नऊ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे हरणा नदीला पूर आला आहे. दर्शनाळ ते अरळी रस्त्यावरील हरणा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. तर अरळी, नन्हेगाव, पितापुर, बोरेगाव येथील ओढे नाले भरून वाहत आहेत.

पितापुर गावात पाणी शिरले आहे

हरणा नदीला पूर आल्याने दर्शना, अरळी, नन्हेगाव, पितापुर गावांचा संपर्क तुटला आहे. पितापूर येथील हरणा नदीवर पूल बांधण्यात आले नाही. यामुळे सहा गावांचा सोलापूर व अक्कलकोट शहराशी संपर्क तुटला आहे. डोंब, रवळगे आणि धोत्री येथील ओढ्याला पाणी आल्याने अक्कलकोट आगाराची एस टी डोंब रवळगे येथे थांबविण्यात आले आहे. तर बोरेगाव ते दर्शनाळ रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने नागरिकांना पाण्यातुन जावे लागत आहे.


पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद, मूग, सोयाबीन आदी खरीप पिकांची नुकसान झाले आहे. तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची ऊस, केळी वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले आहे. बोरेगाव आणि डोंब रवळगे येथील पाझर तलाव पुर्ण भरुन सांडवाने पाणी वाहत आहे. प्रशासनाच्या वतीने दर्शनाळ, हन्नुर, नन्हेगाव, पितापुर आदी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

डोंबरजवळगे येथील लघु पाटबंधारे प्रकल्प  खूप वर्षांनी पुर्णपणे भरले आहे. यामुळे  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हन्नुर परिसरातील अनेक शेतामध्ये पाणी साचले असून बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिसरात गेल्या चाळीस वर्षांनंतर हन्नुर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. पावसामुळे मंगळवारपासून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पितापुर येथील हरणा नदीवर पूल बांधण्यात आले नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पितापुर आणि नन्हेगाव येथील नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर अरळी येथील ओढयावरील बांधण्यात आलेला पुल दोन वर्षांपूर्वी वाहून गेला आहे. यामुळे नागरिकांना सोलापूर अक्कलकोट येथे जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर पायपीट करत केशेगाव मार्गे जावे लागत आहे.

दर्शनाळ, हन्नुर, नन्हेगाव, पितापुर येथील हरणा नदीचे पाणी गावात शिरले आहे. यामुळे गावात  दलदल निर्माण झाले आहे. हन्नुर परिसरात  बुधवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.


 
Top