नळदुर्ग, दि.16 : उस्मानाबाद जिल्हयासह तुळजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-याना तात्काळ मदत करण्याबाबत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नुकतेच झालेल्या अतिवृष्टीने तुळजापूर तालुक्यातील अनेक तलाव तुडूंब भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गावात पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. सतत पडणा-या पावसामुळे ओढे, नाले , तुडूंब भरून वाहत आहेत.मात्र या पावसाने जिल्हयातील दुष्काळ मिटविला असला तरी खरीप हंगाम शेतक-यांच्या हातुन काढुण घेतला असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांच्या सोयाबीनसह इतर बागायत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तुळजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतक-यांची जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर सोयाबीन, कांदे व इतर बागायत पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन अनेक घरात पुराचे पाणी गेल्यामुळे मोठयाप्रमाणात पडझड झालेली आहे . त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. विशेषता तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग , इटकळ , चिवरी , लोहगाव , सिंदफळ , खंडाळा , आपसिंगा , हंगरंगा तुळ, काटी , खुदावाडी गावात सोयाबीन पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
तुळजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावेत, जिल्हयासह तुळजापूर तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई अनुदान देण्याची मागणी केली आहे.
