तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील आपसिंगा गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला.
आपसिंगा गावातील भेटीदरम्यान माजी मंत्री चव्हाण यांनी ग्रामस्थांकडून नुकसानीबद्दल संपूर्ण माहिती घेतली. काही ग्रामस्थांनी तलावाच्या सांडव्याची दिशा बदलल्यामुळे बागायत शेतीचे मोठे नुकसान झालेल्याची कैफियत मांडली. तालुक्यात झालेल्या नुकसानीचे विविध यंत्रणेमार्फत पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
त्याचबरोबर शासन नियमानुसार उभ्या पिकाचे नुकसान भरपाई देण्याचा अध्यादेश आहे. परंतु काही ठिकाणी काढून ठेवलेले सोयाबीन पावसामुळे वाहून गेलेले आहे. त्याचीही नोंद पंचनाम्यात करण्याच्या सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे स्थानिक यंत्रणेला आदेश देऊन लवकरात लवकर पंचनामा करण्याची कार्यवाही करण्याचे सांगितले.
आपसिंगा येथे भेट दिल्यानंतर नागरिकांना शासन स्तरावर आपल्या समस्या मांडून मदत करण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष धिरज पाटील यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
