अचलेर : जय गायकवाड 

सर्वांना प्रिय असणाऱ्या पावसाने मात्र आज मोठा धुमाकूळ घातला. लोहारा तालुक्यातील अचलेर सह आलूर,आष्टा कासार,सलगरा मड्डी,बोरगाव ( तुपाचे),कुंसावळी परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मोठा जोर धरला आहे. या पावसाने परिसरातील नदी,नाले,ओढे ओसंडून वाहत आहेत.

काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची काढणी करून या वातावरणामुळे रास न करता शेतातच त्याचे ढिगारे करून ठेवले आहे.पण या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गावातील जुन्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.तर अनेकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत.

काहीजण बऱ्याच वर्षानंतर इतका मोठा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असे मत व्यक्त करत आहेत तर लहान बालक या धावत्या पाण्याचा आनंद घेत आहेत. अन् एकीकडे उभ्या जगाचा पोशिंदा मात्र डोक्याला हात लावून बसल्याचे पहावयास मिळाले. बऱ्याच शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी एकच उत्तर दिले. "होतंय ते बऱ्यासाठीच".!

 
Top