खानापूर : बालाजी गायकवाड

परतीच्या पावसाने चांगली हजेरी  लावल्याने तुळजापूर तालुक्यातील खानापूर,काटगाव,चव्हाणवाडी, धोत्री,खडकी, या भागातील जनजीवन विस्काळीत झाले आहे.सोयाबीन सह उसाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेकांच्या  घरात पाणी शिरले आहे.

गेल्या चोवीस तासापासून सतत चालू असलेल्या  मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिसरातील साठवण तलाव,पाझर तलाव शंभर टक्के भरून सांडवा वाहत आहे.नाले,ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.यामुळे नागरिकांच्या  घरात पाणी शिरले आहे.अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे.घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू भिजल्या आहेत.या पाण्यामध्ये अनेक जणांची जनावरे वाहून गेली आहेत.


सोयाबीन सह उस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी लावून तर काहींनी सोयाबीन वाळवण्यासाठी घातले होते.मुसळधार पावसाने  सोयाबीनच्या गंजीखाली पूर्णपणे पाणी गेल्याने गंजी भिजल्या आहेत.तर काही ठिकाणी पूर्ण सोयबिन पाण्याखाली गेले आहे. कित्येक शेतकऱ्यांचा ऊस जोराचा पाऊस झाल्याने आडवा झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.काळेगाव-आरळी च्या कृष्णा खोरे प्रकल्प तुडुंब भरला आहे .प्रकल्पाच्या सांडव्यातुन पाण्याचा  मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे.

काटगाव येथील हरणी माध्यम प्रकल्प शंभर टक्के भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने गावातील सखल भागात पाणी शिरले आहे. येथील पुलावरून दोन ते अडीच फूट पाणी वाहत असल्याने काटगावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

तर खानापूर येथील पुलावरून सहा ते सात फूट पाणी वाहत असल्याने गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. तरी शासनाने याचे तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांच्या पुनवर्सनाची सोय करावी.तसेच नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

 
Top