चिवरी : राजगुरु साखरे
"आई राजा उदो उदो" च्या जयघोषात मोजक्या मानकऱ्यासोबत चिवरी ता. तुळजापूर येथील श्री महालक्ष्मी मातेचे पालखी मिरवणूक काढून सिमोल्लंघन दसरा साधेपणाने साजरा करण्यात आला.
राज्यासह जिल्ह्यातील मंदिरे कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नसल्याने बाहेरूनच दर्शन घेऊन भाविक परतत आहेत. चिवरी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी मंदिर कोरोनामुळे बंद असल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच पायरीचे दर्शन घेतले. सकाळपासूनच महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी चालू होती.
महालक्ष्मी मातेची पालखी मंदिरापासून मानाच्या पुजाऱ्याच्या घरी मार्गस्थ करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषता पहिल्यांदाच देवीची छबिना मिरवणूक अत्यंत साधेपणाने व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. दरम्यान देवीच्या जयघोषाने अवघी चिवरी नगरी दुमदुमून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.