नळदुर्ग, दि. 6 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि. ९ आँक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिस-या पर्वाला जागर मोर्चाने सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नळदुर्ग येथे सोमवार दि. 5 रोजी अंबाबाई मंदिर साभागृह येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत पाठिंबा व सहभाग याबाबत नियोजन करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी तुळजापूर येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी सुरू असून आयोजकाकडून तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बैठक घेऊन मोर्चासंबधी माहिती देणे, आवाहन करण्यात येत आहे. तसेच सध्या गावोगावी मोर्चासंबधी वातावराण निर्मिती करण्यासाठी वाहनावर ध्वनीक्षेपक लावून आवाहन करण्यात येत आहे. शहरात व निमशहरी भागात फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत.
ग्रामीण भागात सर्वच वायोगटातील समाज बांधवाकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बैठकीस तरूणांची संख्या लक्षणीय असल्याची व स्वखर्चाने मोर्चात सहभागी होणार असल्याचे प्रत्येक गावातील समाज बांधव सांगत असल्यची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
तुळजापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सज्जनराव साळुंके, जिवन इंगळे, महेश गवळी, कुमार टोले, प्रशांत क्षीरसागर, प्रतिक रोचकरी, राम चोपदार, दिनेश बागल, आप्पासाहेब कापसे, सुनील लागवे, ऋषिकेश सांळूके, नितीन रोचकरी आदींनी ठोक मोर्चाच्या संदर्भात मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या बैठकीस कमलाकर चव्हाण, संजय दशरथ जाधव, अमोल मेंढके, राजेंद्र काशिद, अमित नागणे, विनिल जांभळे, शाम बागल यांच्यासह नळदुर्ग येथील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ९ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने तुळजापूर येथे मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
